Ad will apear here
Next
वन मॅन शो - दिलीपकुमार यांचा ‘गंगा-जमुना’
कोणत्याही सिनेमाची कथा ऐकण्याची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते. अशा कथा सांगणारी बरीच मंडळी असतात; मात्र चित्रपटांच्या पडद्यामागच्या कथा सांगणारी माणसं विरळाच. ‘‘शिणेमाच्या ष्टोरी’मागील गोष्ट’ या अभिजित देसाई यांच्या पुस्तकात अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या चटकदार आणि मजेशीर कथा वाचायला मिळतात. दिलीपकुमार यांची निर्मिती असलेल्या ‘गंगा-जमुना’ या चित्रपटाबद्दलची त्या पुस्तकातील गोष्ट येथे प्रसिद्ध करत आहोत.
.......
नायिका कोण, हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांत शेवटी उपस्थित झाला. दिलीपकुमार एकाच नावावर विचार करत होता ते म्हणजे वैजयंतीमाला. दक्षिणेच्या पट्ट्यात पुरबी भाषेतला सिनेमा विकला जाणं हे मेहबूब खानने सांगितल्याप्रमाणे महाकठीण काम होतं. 

वैजयंतीमालाचं नाव तिथे उपयोगी पडणारं होतं. दिलीपकुमारने दक्षिण भाषिक काही लोकांना बोलावून घेतलं. ‘तुमच्या भाषेतील नायिका पुरबी बोलू लागली तर तुम्ही सिनेमा पाहायला याल का?’ त्या लोकांना ही कल्पना आवडली. त्यामुळे वैजयंतीमालाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं. दृश्य ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्ये चित्रित केलं जात होतं. निवडलेल्या आउटडोअर लोकेशनचा भकास चेहरा मात्र रंगीत सिनेमाकरिता फिट्ट होता. कॅमेरामन व्ही. बाबासाहेब उघड्या जीपवर सज्ज होते. त्यांनी कॅमेऱ्यात डोकावून पाहिलं. 

डोंगरमाथ्यावर पहुडलेला गंगा सूर्यकिरणांच्या आगमनासरशी ओठातल्या ओठात मंद स्मित करत जागा झाला. आसपास ढोल-ताशे वाजवून गावकरी एकमेकांना हाके घालू लागले. गंगा खडबडून जागा झाला. त्याने गावकऱ्यांची फौजच्या फौज हातात काठ्या घेऊन त्याच्या अंगावर चालून येताना पाहिली. एका खंदकाखाली त्याने पैशांचं गाठोडं लपवलं. हातात बंदूक घेत जिवाच्या आकांताने तो झाडाझुडपांतून पळू लागला. 

सिटिझन फिल्म्सचं युनिट त्याला चित्रित करत जीपमधून भरधाव निघालं. शॉट कट् झाला. घामाने डबडबलेल्या दिलीपकुमारने धापा टाकत असताना बाबासाहेबांकडे पाहिलं. 

‘फॅन्टॅस्टिक. शॉट रंगीत हवा. इफेक्ट अधिक येईल.’

पॅकअप झालं. 

रात्री हॉटेलमध्ये विषय निघाला. बाबासाहेब म्हणाले, ‘सिनेमा रंगीत हवा.’ रंगाचा खर्च दिलीपकुमारला परवडणारा नव्हता. ‘मदर इंडिया’ आणि ‘मोगल-ए आझम’चा रंगीत भाग चर्चेच्या केंद्रस्थानी होता. ‘राज कपूरसुद्धा नवं पिक्चर ब्लॅक अँड व्हाइटमध्ये करतोय,’ दिलीपकुमारने स्पष्टीकरण देत विषय संपवला. 

दुसऱ्या दिवशी भरदुपारच्या उन्हात गंगा पुन्हा पळू लागला. गावकरी त्याच्या मागे लागले. धावण्याचा वेग वाढला. डोंगरपठारावरून जात असताना त्याच्या पायाला ठोकर लागली. डोंगरमाथ्यावरून घरंगळत खाली येऊन तो झाडाच्या बुंध्याला आपटला. 

शॉट कट् झाला. 

गुडघे आणि कोपरं खरचटलेला दिलीपकुमार बाबासाहेबांशी चर्चा करत होता. दिग्दर्शक नितीन बोसला मान डोलावण्यापलीकडे विशेष काम नव्हतं. दिलीपकुमारने पुढच्या शॉटची संकल्पना सांगितली. चेहऱ्यातला भकास भाव प्रकर्षाने बाहेर काढण्यासाठी गंगाच्या दाढीचे खुंट भडक रंगवण्यात आले. ‘ब्लॅक अँड व्हाइट’मधून चेहऱ्यावरचा काळा रंग अंगावर यावा ही अपेक्षा होती. 

सिनेमाचं हायलाइट दृश्य तुकड्यातुकड्यांत चित्रित केलं जात होतं. आणि तरीही त्याचा एकसंध परिणाम प्रेक्षकांचा थरकाप उडवण्यास कारणीभूत ठरावा यासाठी दिलीपकुमारचं युनिट प्रयत्नशील होतं. 

झाडाच्या बुंध्यावर आपटल्यासरशी झाडावरून उडालेले पक्षी आणि गंगाचे निष्प्राण डोळे मिळून तीव्रतेचा समन्वय साधत होते. 

पुढचा शॉट पाण्याच्या ओढ्याकडे घेण्यात आला. 

तहान भागवण्यासाठी गंगा पाण्याच्या दिशेने झेपावला. पाण्यात त्याला सभोवताली उभ्या गावकऱ्यांचं प्रतिबिंब दिसलं. त्याचे हात-पाय थरथरू लागले. हातात बंदूक, पण ती चालवायची कशी? हरीबाबूच्या माणसाने ‘आव बेटा’ म्हणत भला मोठा दोर गंगाच्या गळ्याकडे फेकला. गंगाकडून निकराचा प्रतिकार. तीन-चार-पाच गावकरी मिळून दोर खेचू लागले. प्रतिकारशक्ती कमी पडून गंगा जमिनीवर पडला. त्याच वेळेस नकळत त्याच्या हातून बंदुकीचा चाप ओढला गेला. धडामकन् गोळी सुटली. गावकरी भयचकित होऊन एकेक पाऊल मागे टाकू लागले. आता गंगा एकेक पाऊल पुढे टाकत त्यांना बोलावू लागला. 

‘ऐ आव रे आव, ऐ बिलवा आव 
 ऐ गोपाल, आव हमका लई जाव-आव’

त्याला बंदूक चालवण्याची युक्ती कळली होती. तो चाप ओढत हवेत गोळ्या सोडू लागला. गावकरी जीवाच्या भयाने पळत सुटले. आता गंगा कुलंगी कुत्र्याप्रमाणे त्यांच्या मागे लागला. 

दृश्य कट् झालं. लोकेशनवर आणखी दोन तासांचं काम शिल्लक राहिलं होतं आणि त्यासाठी नायिकेची आवश्यकता होती. चित्रित दृश्य ‘लार्जर दॅन लाइफ’ बनून अंगावर येणार अशी दिलीपकुमारची खात्री झाली. तेवढा भाग रंगीत करण्याचा मनोदय दिलीपकुमारने युनिटसमोर व्यक्त केला. 

मुंबईत परतल्यावर तेवढ्या एका दृश्याची कच्ची ट्रायल युनिटने मोठ्या पडद्यावर पाहिली. पडद्यावर दिसत होतं ते सगळं कच्चं असूनही अद्वितीय होतं. संपूर्ण सिनेमा टेक्निकलरमध्ये चित्रित करण्याचा निर्णय दिलीपकुमार आणि त्याच्या भावाने नासिर खानने घेतला. 

एका अद्वितीय कलाकृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

(‘‘शिणेमाच्या ष्टोरी’मागील गोष्ट’ हे अभिजित देसाई यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZCUCH
Similar Posts
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊनसुद्धा त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहीत नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळिसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language